रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वाकवली नं. १ जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेने केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये स्थान मिळवून ऐतिहासिक पराक्रम केला आहे.

१८९६ साली स्थापन झालेल्या आणि ब्रिटिशकालीन इतिहास असलेल्या या शाळेने आधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सुविधांमुळे शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लवकरच नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते या शाळेला ‘पीएम श्री’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.

वाकवली नं. १ जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी आहे.

या शाळेच्या निवडीबद्दल दापोलीचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिक्षक आणि ग्रामस्थांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले.

ते म्हणाले,

माझ्या मतदारसंघातील वाकवली नं. १ शाळेची देशात प्रथम क्रमांकासाठी झालेली निवड ही माझ्यासह संपूर्ण कोकणवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.

त्यांनी शाळेला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

याशिवाय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनीही शाळेच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

शाळेतील मुख्याध्यापक जावेद शेख, माजी मुख्याध्यापक विलास तांबे, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ, गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, विस्ताराधिकारी बळीराम राठोड, रेखा पवार आणि केंद्रप्रमुख विलास धामणे यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रणाली धुमाळ, उपसरपंच राजेंद्र तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्गेश जाधव, उपाध्यक्ष समीर कुरेशी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या यशामुळे वाकवली गावासह संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण आहे.