दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे रोजी रात्री ८ वाजता फिर्यादी इब्राहिम अली पांगले यांच्या हर्णे येथील राहत्या घरी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इब्राहिम पांगले (वय ३४) आणि आरोपी मुजफ्फर रियासत सय्यद, शबाना इक्बाल सरदार आणि आरम सरदार हे सर्व हर्णे येथे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात गाडी पार्किंगच्या जागेवरून वाद होता. ५ मे रोजी रात्री आरोपी मुजफ्फर सय्यद याने फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला आणि ‘तुमची गाडी काढा’ असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, त्याने फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादीचे वडील अली इब्राहिम पांगले, आई ताज बेगम आणि पत्नी अफ्रिन हे भांडण सोडवण्यासाठी आले असता, आरोपी मुजफ्फरने साक्षीदार अली पांगले यांच्या तोंडावर ठोसा मारून त्यांना दुखापत केली व त्यांचा चष्मा तोडून टाकला. त्यानंतर आरोपी शबाना सरदार आणि आरोपी आरम सरदार हे देखील घटनास्थळी आले आणि त्यांनी फिर्यादी व साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादी इब्राहिम अली पांगले यांच्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी आरोपी मुजफ्फर रियासत सय्यद, शबाना इक्बाल सरदार आणि आरम सरदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, आरोपींनी त्यांची गाडी व्यवस्थित लावण्यास सांगितल्यावर आरोपी इब्राहिम अली पांगले याने त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी नमाजसाठी जात असताना आरोपींच्या घरासमोरून जात असताना पुन्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. याबद्दल विचारणा केल्यावर आरोपी अली इब्राहिम पांगले, अफ्रिन इब्राहिम पांगले, ताज बेगम अली पांगले, गजाला पठाण, खालिदा तवसाळकर, उबेद तयसाळकर आणि अब्दल रज्जाक खालिद पांगले यांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवला. इब्राहिम पांगले याने फिर्यादीला हाताच्या ठोशाने मारून दुखापत केली, तर गजाला पठाण आणि ६ खालिदा तवसाळकर यांनी काळ्या रंगाच्या वस्तूने व टोपाने मारहाण केली असे मुजफ्फर सय्यद यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. दुसऱ्या बाजूने मुजफ्फर रियासत सय्यद (वय ४२, रा. हर्णे बंदर मोहल्ला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपी इब्राहिम अली पांगले, अफ्रिन इब्राहिम पांगले, अली इब्राहिम पांगले, ताज बेगम अली पांगले, गजाला पठाण, खालिदा तवसाळकर, उबेद तयसाळकर आणि अब्दल रज्जाक खालिद पांगले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे हर्णे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीनुसार 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.