मालगुंड: रत्नागिरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी मालगुंड ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज ग्रामपंचायत सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडली. या ग्रामसभेत अजेंड्यानुसार विविध विषयांवर चर्चा होऊन मालगुंड गावाच्या विकासकामांच्या दृष्टिकोनातून अनेक ठराव मंजूर करण्यात आले.
ग्रामसभेत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि सदस्य निवडण्याच्या विषयावर चर्चा सुरू झाल्यावर रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती व माजी सरपंच प्रकाश साळवी यांनी उभे राहून मालगुंड गावचे ग्रामस्थ व माजी कृषी अधिकारी विलास राणे यांच्या नावाची सूचना केली. त्यांनी सर्व ग्रामस्थांकडून त्यांची बिनविरोध निवड होण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. याचवेळी मालगुंड गावचे शाखाप्रमुख अतुल पाटील यांनीही या नावाला अनुमोदन देत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, मालगुंडचे माजी उपसरपंच संतोष चौगुले हेही तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र, विलास राणे यांचे नाव सर्वानुमते पुढे आल्यानंतर संतोष चौगुले यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्यांनी सांगितले की, कृषी अधिकारी म्हणून राणे यांनी लोकसेवा उत्तम प्रकारे केली असून, अशा सर्वसमावेशक व्यक्तीची निवड होत असल्याने मी माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून स्वागत केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाटील यांनी संतोष चौगुले यांचे कौतुक करत नवनियुक्त अध्यक्ष विलास राणे यांचे अभिनंदन केले.
या ग्रामसभेला मालगुंड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीद्वारे राणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मालगुंड गावचे ग्रामस्थ व रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. सभेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, जिल्हा बँकेचे संचालक व रत्नागिरी तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील, तालुका संघटक रोहित मयेकर, उप तालुकाप्रमुख राजू साळवी, माजी सभापती साधना साळवी, शाखा प्रमुख अतुल पाटील, उद्योजक शेखर खेऊर, उदय साळवी, विकास साळवी, परेश हळदणकर, सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, ग्रामपंचायत सदस्य सन्मान मयेकर, अतुल पाटील, डांगे, शुभदा मुळ्ये, प्रीतम मयेकर, शिल्पा पवार, जगन सुर्वे, संजय खेऊर, गोणबरे, संतोष चौघुले यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. तसेच, जयेंद्र खोत, सुहास पाटील, रामानंद लिमये, दीपक दुर्गवळी, संजय दुर्गवळी, रोहित साळवी, भैय्या साळवी, बंडू साळवी, संतोष साळवी, सायली साळवी, संदीप देसाई, योगेश साळवी, अनघा तोडणकर, पोलीस पाटील आस्था साळवी, सिद्धी मांडवकर, अमोल राऊत, शशिकांत पवार यांच्यासह वाडीप्रमुख व विलास राणे यांचे कुटुंबीय विशाखा राणे, ओंकार राणे, पूजा राणे उपस्थित होते. सर्वांनी राणे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास राणे यांनी सांगितले की, येत्या काळात गावातील सर्वसामान्यांना अपेक्षित असणाऱ्या बाबींना प्राधान्य देऊन गावात शांतता व सौहार्दता जपण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गणपती उत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सण-उत्सवात गावामध्ये आनंदी वातावरण राहील आणि त्यासाठी योग्य संवाद साधून शांतता कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.