महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केन्द्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी, जि अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. २७) डॉ प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. के.पी. विश्वनाथ यांचा  कार्यकाळ नियत वयोमानानुसार ४ नोव्हेंबर २०२० पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.  
डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी प्राप्त केली आहे.   
कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी डॉ. लक्ष्मण सिंह राठोड, माजी महासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह व राज्याच्या कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवळे हे सदर समितीचे सदस्य होते.
 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*