दापोली : कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडियातर्फे मनुष्यबळ विकास, ज्ञान निर्मिती, उद्यानविद्येच्या प्रसारासाठी दिलेलं भरीव योगदान आणि वचनबद्धतेसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना CHA पुरस्काराने गौरवलं गेलं. तेलंगणा राज्यतील हैदराबाद येथे झालेल्या सोहळ्यात कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी हा सन्मान स्विकारला.
डॉ. एस. डी. सावंत यांनी 1978 साली दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती आणि त्यांनी पदव्युत्तर पदवी प्लांट पॅथॉलॉजी या विषयात 1980 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पीएचडी 1986मध्ये जी.बी. पंत कृषी व प्रसादशास्त्रीय विद्यापीठातून प्लांट पॅथॉलॉजीत केली. त्याच वर्षापासून म्हणजे 1986 पासून शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. ICAR NRCG पुणे येथे ते 2013मध्ये संचालक म्हणून रूजू झाले. त्यानंतर मार्च 2019 मध्ये त्यांची कुलगुरू म्सणून निवड झाली.
36 वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत डॉ. सावंत यांनी संशोधन, शिक्षण आणि ज्ञानाच्या प्रसारामध्ये लक्षणीय योगदान दिलं आहे.
भारतातील द्राक्षांच्या रोगांचे निदान आणि द्राक्षाच्या रोगांचे व्यवस्थापन करण्यामध्ये डॉ. सावंत यांचं योगदान मोठं आहे. त्यांच्या संशोधनाचा उपयोग परदेशातील शास्त्रज्ञांनी देखील करून घेतला आहे.
त्यांनी पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये अनेक वैज्ञानिक लेख प्रकाशित केले आहेत. त्याचबोबर रोगांच्या व्यवस्थापनावर त्यांनी 9 पुस्तके प्रकाशित केली आहेत.
त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.