दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंपरा, उत्साह आणि आनंदाने नटलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या मातांसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते.
नर्सरी ते दुसरी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मातांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि भोंडल्याच्या गजरात सादर केलेल्या पारंपारिक गाण्यांनी व खेळांनी सर्वांना बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमात उखाणा स्पर्धा आणि खिरापत ओळखण्याचा खेळ यांसारख्या मजेदार उपक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधले. उखाण्यांच्या गमती-जमतींनी उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले, तर खिरापत ओळखण्याच्या खेळाने कार्यक्रमाला आणखी रंगत आणली.
पारंपारिक वेशभूषा आणि खिरापत ओळखण्याच्या स्पर्धेत सौ. मिनाक्षी सोनावणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सौ. सोनिका खानविलकर यांनी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. उखाणा स्पर्धेत सौ. स्वप्नाली झाटे यांनी प्रथम, तर सौ. अक्षता तांडेल यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. मातांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मुलांसोबत अनुभवलेला आनंद हा या भोंडला कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. अशा पारंपारिक उपक्रमांमुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ होत असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका चंदाली पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.