कोल्हापूर – महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आज सकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिके आणि फळबागांना बसला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ अंदमान-निकोबार बेटांच्या दिशेने सरकत असल्यामुळे हवामानात बदल झाला आहे. यामुळे विदर्भात २ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोल्हापूरच्या अनेक गावात आज सकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने थोडा दिलासा मिळाला. परंतु पावसाचा फटका रब्बी पिके आणि फळबागांना बसला आहे. याशिवाय सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले. त्यामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उद्या २१ मार्चला विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.