दापोली: शहरात ‘अंडरवेअर गँग’ सक्रिय असल्याच्या अफवांना दापोली पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे.

दापोलीमध्ये जव्हार वाडा येथील अंडरवेअर गँग सक्रिय असून, त्यांनी दापोली न्यायालयाच्या परिसरात तोडफोड करून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा काल रात्रीपासून शहरात सुरू होती.

या घटनेतील तिघांपैकी एकाला पकडल्याचे आणि बाकीचे फरार असल्याचेही बोलले जात होते.

मात्र, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत न्यायालयाच्या परिसरात आढळून आली होती.

पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. ही व्यक्ती कोणत्याही गँगशी संबंधित नसून, ती कोर्टात का शिरली याचा तपास पोलीस करत आहेत.

या व्यक्तीविरुद्ध दापोली येथे ‘ट्रेस-पासिंग’चा (अनाधिकृत प्रवेश) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी ‘माय कोकण’शी बोलताना सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

पोलीस योग्य ती खबरदारी घेत आहेत आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे..

त्यामुळे ‘अंडरवेअर गँग’च्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.