कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा सरस करू – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा निर्धार, पत्रकारांनी विकासाची प्रसिद्धी करावी

रत्नागिरी : कोकणचा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला असून, येथील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा अधिक सरस करून परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचा निर्धार उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोकणची समृद्धता आणि विकास जगभर पोहोचविण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी (दि. ३१ मे व १ जून २०२५) ते बोलत होते. या कार्यशाळेत पत्रकारांच्या भूमिकेवर आणि कोकणच्या विकासावर विशेष भर देण्यात आला.

डॉ. सामंत म्हणाले, “महाराष्ट्रातील पत्रकारितेचा पाया कोकणाने घातला आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आणि बाबूराव पराडकर यांसारख्या थोर पत्रकारांचा वारसा कोकणात आहे. माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत पत्रकारांनी माझे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मला पत्रकारांबद्दल विशेष आत्मीयता आहे.”

त्यांनी कोकणच्या विकासाची प्रसिद्धी करण्याचे आवाहन करताना सांगितले की, कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा. यासाठी भविष्यात राज्यभरातील पत्रकारांसाठी अशा कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांच्या समस्यांवर बोलताना डॉ. सामंत म्हणाले, “आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार अथक परिश्रम घेतात. अशा वेळी त्यांच्या पाठीशी राज्यकर्त्यांनी शंभर टक्के उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. पत्रकारांसाठी आवश्यक सेवा-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. महाराष्ट्रात पत्रकारांचा केवळ सन्मानच नाही, तर त्यांच्यासाठी सुविधाही निर्माण केल्या जातील. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.”

यावेळी त्यांनी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, कोकण विभागीय माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.

या कार्यशाळेत कोकणातील पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा झाली. पत्रकारांच्या कल्याणासाठी सुविधा निर्माण करण्याचे आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन डॉ. सामंत यांनी दिले. कोकणातील पत्रकारितेचा समृद्ध वारसा आणि त्याची आजच्या काळातील आव्हाने यावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी मनोज जालनावाला, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, वरिष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वणजू यांच्यासह कोकणातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

कोकण विभागीय माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर यांनी प्रास्ताविक केले, तर ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी सूत्रसंचलन केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*