
रत्नागिरी – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला पूर्ण यश मिळेल, असा दावा पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दावोस दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
रत्नागिरी तालुक्यात पावस गटातून ॲड. महेंद्र मांडवकर (जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष), खेडशी गटातून हर्षदा भिकाजी गावडे, शिरगाव गटातून श्रद्धा दीपक मोरे, गोळप गटातून नंदकुमार उर्फ नंदा मुरकर, खालगाव गटातून तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील दहा जागांपैकी पाच जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत.
संगमेश्वर तालुक्यात कसबा गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना राजेंद्र महाडीक, मुचरी गटातून माधवी गिते यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. गुहागर तालुक्यात वेळणेश्वर गटातून नेत्रा ठाकूर तर पडवे गटातून माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
रत्नागिरी पंचायत समितीसाठी हातखंबा गणातून विद्या बोंबले, देऊड गणातून नेहा गावणकर, केल्ये गणातून सुमेश आंबेकर, नाणीज गणातून डॉ. पद्मजा कांबळे आणि साखरतर गणातून परेश सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
पालकमंत्री सामंत यांनी सांगितले की, खेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव राज्यमंत्री योगेश कदम लवकरच जाहीर करतील. तेथे भाजपाचा सन्मान राखून जागा सोडल्या जातील. शिवसेना-भाजप युतीबाबत स्थानिक पदाधिकारी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, जिल्हा परिषदेतही युतीचा शब्द पाळला जाईल.
चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत होईल, तर संगमेश्वर तालुक्यात महायुती एकत्र लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा झाली आहे. लांजा-राजापूरमधील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील.

Leave a Reply