वीस हजार एसटी कामगारांना पगारच नाही

गेल्या महिन्याभरापासून संपावर असलेल्या एस.टी. कामगारांच्या खात्यावर अखेर मंगळवारी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन जमा झाले. एस.टी. महामंडळाने 100 टक्के कामगारांचे वेतन 7 तारखेला केल्याचा दावा केला आहे. संपात सामील नसलेल्या सुमारे 10 हजारांहून अधिक कामगारांना वेतनवाढीसह 100 टक्के सुधारित वेतन मिळाले असून, 60 हजार कामगारांना वेतन कपातीचा सामना करावा लागला आहे. उरलेल्या 20 हजारांहून अधिक कामगारांनी एकही दिवस भरलेला नसल्याने त्यांची पगाराची पावत निघाली असली, तरी त्यांच्या खात्यावर शून्य रक्‍कम जमा झाल्याची माहिती आहे. याबाबत एस.टी. महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, महामंडळाने 100 टक्के कामगारांचे वेतन मंगळवारी केले आहे. एस.टी. महामंडळाचे सर्वचे सर्व 250 आगार हे 9 नोव्हेंबरनंतर संपात सामील झाले. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू असलेल्या आगारांमधील कार्यरत कामगारांना त्या आठवड्याभराचे वेतनही सुधारित वेतनानुसार दिले. संपापासून दूर असलेले यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या खात्यात वेतनवाढीसह 100 टक्के पगार जमा झाला
आहे. दरम्यान, सुमारे 20 हजार कामगार हे ऑक्टोबर महिन्यापासूनच संपावर असल्याने त्यांना वेतनवाढ मंजूर झाली असली, तरी नोव्हेंबर महिन्यातील शून्य उपस्थितीमुळे त्यांच्या खात्यावर शून्य पगार जमा झालेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*