रत्नागिरी:- शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून क्षयरुग्णांची नोंदणी निक्षय प्रणालीमध्ये करणे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना अनिवार्य आहे, असे मत जिल्हाधिकारी बी.एन. पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे टीबी फोरम समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते.
क्षयरुग्णांसाठी 500 रुपये पोषणआहार-लाभ शासनातर्फे दिले जातात. नोंद नसल्यामुळे त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागते. क्षयरुग्णांचे निदान व बाधित रुग्णांवर उपचार करणार्या आरोग्य संस्थांनी निक्षय प्रणालीमध्ये नाव नोंदवून क्षयरुग्णांची नोंदणी करावी. सर्व संशयीत क्षयरुग्णांची धुंकी तपासणी व एक्स-रे तपासणी तसेच निदान झालेल्या क्षयरुग्णांचा संपूर्ण कालावधीचा उपचार जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये मोफत केला जात असून, क्षयरुग्णांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.