लातूर : तायक्वांडो असोसिएशन ऑफ लातूरच्या वतीने दि. ५ ते ७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे आयोजित ३५ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वॉंडो स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबच्या कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिने रौप्यपदकाची कमाई केली.
राज्यभरातून जवळपास ३०० खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. वरिष्ठ गटातील आपली पहिलीच राज्य स्पर्धा खेळणाऱ्या त्रिशाने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. सध्या लोकनेते शामरावजी पेजे आर्ट्स, कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिकणाऱ्या त्रिशाची ही १७ वी राज्यस्तरीय स्पर्धा ठरली.
आंतरराष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र राज्य स्वयंसिद्ध प्रशिक्षक श्री. प्रशांत मनोज मकवाना तसेच महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशाने हे यश मिळवले. त्रिशाच्या यशात पालकांचा मोलाचा वाटा आहे.
रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिदें, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष नीरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारिणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमनर, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण के., खजिनदार शशांक घडशी, गणराज क्लबच्या अध्यक्षा पूजा शेटये, उपाध्यक्षा साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडक, सौ. स्नेहा मोरे, परेश मोडक, शलाका जावकर, एस.आर.के.चे प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत यांच्यासह पालकवर्ग व चाहत्यांनी त्रिशावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

