खेड – खेड तालुक्यातील रसागळगड येथून सुमारगडावर गेलेल्या मुंबईतील चार गिर्यारोहक रात्रीच्या अंधारात जंगलात अडकले होते.

त्यांना स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलिसांनी मदत करत सुखरुप सुटका केली. अडकलेल्यांमथ्ये ज्ञानेश्वर खाडे (बदलापूर), योगेश खोपकर (वडाळा), जालिंदर सिंग (ऐरोली) आणि अनुराग आर्य (वडाळा) यांचा समावेश होता.

रसाळगड येथील पहाणीनंतर चौघेजण पायवाटेने डोंगर दरीतून सुमारगड कडे गेले. सुमारगड हा किल्ला चोहोबाजूंनी तटबंदी कोसळलेल्या स्थितीत असून अनेक पर्यटक आणि गिर्यारोहक येथे येतात.

गडाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असल्याने माहितगार माणूस येथील पायवाट दाखविण्यासाठी लागतो. गडावर फिरल्यावर चौघेही वस्तीकडे यायला निघाले. तेव्हा त्यांची पायाखालची पायवाट चूकली.

ते चूकीच्या वाटेने भरकटले. तुफानी पाऊस, गार वारा आणि गर्द काळोखात जंगलमय भागात अडकून पडले. मोबाईल लोकेशन वर त्यांचे चालणे सुरु होते. रात्री वाढतं होती आणि रस्ता सापडतं नव्हता, चूकीचा मार्गावर अडकले गेल्याने त्यांनी मदतीसाठी प्रयत्न केला.

परंतु सह्याद्रीच्या डोंगर दरीत कुणीच नव्हतं. त्यानंतर प्रयत्न करुन ते थकले. तेव्हा त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे संपर्क साधत मदत मागितली.

तेथून खेड पोलिस ठाण्यात फोन वरुन सांगितले गेलं. तिथून स्थानिक पोलिस विक्रम बुरोंडकर,श्री. माने हे रवाना झाले. त्यांनी पोलीस पाटील व ग्रामस्थ यांची मदत घेवून गिर्यारोहक अडकलेल्या ठिकाणी गेले.

त्यांना जंगलातून सुखरुप वस्तीत आणले. यामध्ये पो.पा. बाळकृष्ण कासार, भार्गव चव्हाण यांच्याबरोबर सुमारगड धनगरवाडीचे राया भंडारे आणि मांडवे गावचे सचीन मोरे यांनी शोधून काढले. अडकलेल्या गिर्यारोहक यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.