मंडणगडच्या रोशनी सोनघरे यांचा एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बुरी गावची रहिवासी आणि एअर इंडियाची एअर हॉस्टेस कुमारी रोशनी राजेंद्र सोनघरे (वय २७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रोशनी सध्या डोंबिवली येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होती. तिने अल्पावधीत आपल्या कार्यकुशलतेने नावलौकिक मिळवला होता, मात्र नियतीने तिचे स्वप्न अर्धवट सोडले. रोशनी गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियात कार्यरत होती. यापूर्वी ती स्पाईस जेट या विमान कंपनीतही कामाला होती. लहानपणापासून तिचे एअर हॉस्टेस बनण्याचे स्वप्न होते, जे तिने मेहनतीने पूर्ण केले होते. मात्र, या अपघाताने तिचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले.

रोशनीच्या पश्चात आई राजश्री सोनघरे, वडील राजेंद्र सोनघरे (टेक्निशियन), आणि भाऊ विघ्नेश (शिपिंग कंपनीत कर्मचारी) असा परिवार आहे. अपघातापूर्वी सकाळी रोशनीने आपल्या आईशी फोनवर संभाषण केले होते, जे तिचे कुटुंबीयांशी शेवटचे संभाषण ठरले. घटनेची माहिती मिळताच तिचे वडील आणि भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत. कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती कुटुंबाला देण्यात आलेली नाही. रोशनीचे लग्न ठरत असल्याची चर्चा नातेवाइकांमध्ये सुरू होती.

रोशनीचा मामा प्रवीण सुखदरे यांनी याबाबत माहिती दिली. डोंबिवलीत स्थायिक होण्यापूर्वी रोशनी आणि तिचे कुटुंब मुंबईतील ग्रँट रोड येथे वास्तव्यास होते. तिचे सर्व शिक्षण तिथेच झाले. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या रोशनीने प्रतिकूल परिस्थितीतही आपले यश मिळवले होते. तिच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्यासह डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*