टोइंग व रिकव्हरी व्हॅनचे दर निश्चित!

चिपळूण– येथील पूरस्थितीमुळे चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीमध्ये टोईंग अथवा रिकव्हरी व्हॅन चालकांकडून मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जात आहे, अशा तक्रारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने टोइंग व्हॅन व रिकव्हरी व्हॅनकरिता भाडेदर निश्चित केले आहेत. यापेक्षा अधिक दर आकारणाऱ्या व्हॅन चालक / मालकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरण चे सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी दिली आहे. वाहनांमध्ये अक्षरशः चिखल भरल्याचे चित्र पाहायला मिळत होते. या वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी टोईंग करून ही वाहने कंपनीमध्ये अथवा दुरुस्तीच्या ठिकाणी न्यावी लागत आहेत. काही टोईंग वाहन चालक / मालकांकडून अधिक रक्कम भाडे स्वरूपामध्ये वसूल केली जात आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या माध्यमातून टोइंग व रिकव्हरी व्हॅनची भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.

हे आहेत दर
टोइंग व्हॅन क्रेन व रिकव्हरी व्हॅन क्रेन यांचे कमीत कमी भाडे 1500 रु निश्चित करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे हे प्रतिकिलोमीटरच्या दरानुसार आकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. टोइंग व्हॅन क्रेनसाठी 22 रु प्रति किलोमीटर (येऊन- जाऊन) व रिकव्हरी व्हॅन क्रेनसाठी 25 रु. प्रति किलोमीटर (येऊन- जाऊन) असे भाडेदर निश्चित करण्यात आले आहे.

असा होईल दंड
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या या भाडे दरापेक्षा जादा भाडे दर आकारणी केल्यास अशा वाहनचालक व मालकावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या संदर्भातील पहिल्या गुन्ह्यासाठी 10000 रु व दुसऱ्या गुन्ह्यासाठी 20000 रु दंड निश्चित करण्यात आला आहे. या वाहन चालक / मालकांकडून तिसऱ्या वेळी जादा भाडेदर आकारली गेल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व प्राधिकरणाचे सदस्य तथा जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही भाडेदर निश्चित करण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*