मुंबई: मार्च महिन्यातील उकाड्याने सध्या सर्वच जण हैराण झाले आहेत. थंडी गेल्याने मुंबईत उकाडा चांगलाच वाढला आहे. मात्र यंदा उन्हाळ्यात हा उकाडा सहन करावा लागणार आहे. कारण मुंबईसह कोकणात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तीव्र असणार असल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे.

सरासरी मुंबईतील तापमान हे 33 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. यात मात्र 5 मार्च ते 11 मार्च दरम्यान 2 अंश सेल्सिअसपर्यंत अधिकची वाढ होण्याची शक्यता आहे. तीव्र तापमानामुळे ह्या उन्हाळ्यात जास्त उकाडा जाणवणार आहे.

आयएमडीने उपविभागवार अंदाज वर्तवले आहेत. देशात एकूण ३६ उपविभाग असून त्यातले चार महाराष्ट्रात आहेत. कोकण (गोव्यासह), मध्य महाराष्ट्र (हा उत्तर दक्षिण असा उभा पट्टा), विदर्भ आणि मराठवाडा असे हे चार उपविभाग आहेत. त्यापैकी कोकण-गोवा पट्टय़ात यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. कोकण परिसरात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी तापमान जास्तच राहण्याची चिन्हे आहेत. मध्य महाराष्ट्रातही रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रावरून वाहून येणारं बाष्प मध्य महाराष्ट्रातही उकाडा वाढवेल, अशी चिन्हं आहेत. अर्थात हे सगळं त्या त्या वेळच्या वाऱ्यांवर अवलंबून आहे.