दापोलीत व्यापाऱ्याची तीस लाखाची फसवणूक

दापोली : दापोली मध्ये काहीच दिवसापूर्वी फोन पे द्वारे व्यवहार करताना एसबीआय दापोली ब्रँच शाखेतील खातेदाराला दीड लाखाचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा दापोली तालुक्यातील जालगाव येथील एका घाऊक व्यापा-याची तब्बल तीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तशी तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे दाखल झाली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील अधिक तपास करित आहेत.

सविस्तर वृत्त
एका महिलेने 93 लाख रुपये किमतीचे पाउंड कुरियरने पाठवले आहेत. ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका घाऊक व्यापाऱ्याची तब्बल 30 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली असून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालगाव येथील फसवणूक झालेल्या व्यापा-याची जानेवारी 20 मध्ये अमेलिया जॅक्सन नावाच्या लंडन येथील एका महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. फेब्रुवारी मध्ये या महिलेने त्यांच्या व्हाट्सएपवर एक पार्सल पाठविले आहे असा मेसेज केला, पार्सल मध्ये असलेल्या वस्तूंचे फोटोही व्हाट्सएपवर टाकले. त्यानंतर प्रिया पिठे या महिलेने तुमचे विमानतळावर कुरियर आले आहे त्यात फोटोत दाखविलेल्या वस्तू व 93 लाख रुपये किमतीचे पाउंड आहेत, त्यांनी यासंदर्भात कस्टम व रिझर्व्ह बँक या शासकीय आस्थापना यांची प्रमाणपत्रेही पाठविली होती, ही कागदपत्रे खरी असतील हे गृहीत धरून त्या व्यापा-यानी त्यांच्याकडे मागणी केली जात होती तसे बँकेत पैसे भरले, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने त्याना दोन एटीम कार्डही पाठवली या एटीएम द्वारे त्या व्यापा-यानी 2 वेळा पैसेही काढले, या सर्व प्रकारात जालगाव येथील त्या व्यापा-यांनी तब्बल 30 लाख 73 हजार 100 रुपये या व्यक्तींनी पाठविलेल्या ई-मेल मध्ये दिलेल्या बँक खात्यात भरणा केले. त्यानंतर त्याना अद्याप कुरियर आलेले नाही त्यामुळे आपण फसले गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस ठाणे गाठून अमेलिया जॅक्सन, प्रिया पिठे, पूजा शर्मा यांचे विरोधात प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे, या तक्रारीनुसार दापोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे,
फेसबुक, व्हाट्सएप अशा सोशल मीडियातून फसवणुकीचे प्रकार घडत असून या लोकांच्या प्रलोभनाला आकर्षित होऊन अनेक व्यक्ती त्यांनी आयुष्यभराची जमवलेली पुंजी पणाला लावत असून त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांना मोठा धक्का बसत आहे, त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*