दापोली एसटी आगारातील श्री दत्तगुरू मंदिराच्या दानपेटीवर चोरट्याचा डल्ला, काही तासांतच आरोपी गजाआड

दापोली: सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक वास्तव दापोलीतून समोर आले आहे.

दापोली एसटी आगाराच्या आवारात असलेल्या श्री दत्तगुरू मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने ५०० ते ७०० रुपयांची किरकोळ रक्कम लंपास केली.

ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली.

मात्र, दापोली पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच दापोली आगाराचे बस अधिकारी राजेंद्र एकनाथ कुबाळे (वय ५७, रा. बस अधिकारी क्वार्टर्स, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

त्यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात इसमाने मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली आणि त्यातील सुमारे ५०० ते ७०० रुपये चोरी केले.

या प्रकरणी कुबाळे यांनी कायदेशीर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

दापोली पोलीस ठाण्यात भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) अंतर्गत गु.आर. क्र. १९१/२०२५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

तांत्रिक माहिती आणि स्थानिकांच्या सहकार्याने पोलिसांनी तपास करत आरोपीचा माग काढला. १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांनी पोलिसांनी ओम बाळकृष्ण सातपुते (वय ३९, रा. तळेगाव ढमढरे, ता. शिरुर, जि. पुणे) याला अटक केली.

प्राथमिक तपासात त्यानेच दानपेटी फोडून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

जरी चोरीची रक्कम किरकोळ असली तरी धार्मिक स्थळावर दरोडा टाकण्याच्या या कृत्यामुळे दापोली परिसरात संतापाचे वातावरण पसरले होते.

पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला तातडीने अटक झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Advertisement

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*