राज्यात करोनाच्या नियमांमध्ये कोणतीही सूट नाही” आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र असं असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी आहे. असं असलं तरी करोनाचा धोका पाहता राज्यात करोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. यामुळे व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे.

दुकानं आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल नसतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी या केंद्र सरकारकडून मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचं राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सध्यात राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्तीचं वय ६२ पर्यंत वाढवण्यात आलं आहे. सेवा निवृत्तीचं वय वाढवण्यास कार्योत्तर मान्यता मंत्रिमंडळानं दिली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांची रिक्त जागा भरण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*