रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील बंद मोबाईल शॉपी फोडून २ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती मंदिर परिसरातील नाचणे रोड येथे असलेले मोबाईल वर्ल्ड दुकान गुरूवारी रात्री बंद झाले. सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप फोडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शटरचे कुलूप फोडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलिसांशी संपर्क साधला. दुकानातून १५ महागडे मोबाईल व ४० हजार रूपयांची रोख रक्कम असा मिळून सुमारे २ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दुकान मालक अल्ताफ मेमन यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.