दापोली : शहरातील टांगर गल्ली सहकारनगर येथील वजीर कॉम्प्लेक्समधील घर फोडून सुमारे १४ लाख ५३ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरफोडी प्रकरणातील फिर्यादी यास्मिन हवा (४२, रा. टांगर गल्ली, सहकारनगर) या वजीर कॉम्प्लेक्स दुसरा मजला रूम नं. २०१ मध्ये वास्तव्यास आहेत.

त्यांचे घर बंद असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या बंद घराचे दाराचे लॉक तोडून घरात काही संशयितांनी प्रवेश केल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

यास्मिन यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातून रोख रक्कम रु. १० लाख तसेच ४० हजार रुपये किंमतीचे २ तोळे वजनाचे १७ वर्षापूर्वी खरेदी केलेली चेन व मंगळसूत्र असे सोन्याचे दागिने, ३२ हजार रुपयांचे ३२ तोळे चांदीचे दागिने, ५६ हजार रुपयांचे ४ मोबाईल, ४५ हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा लॅपटॉप, असा अन्य मुद्देमालासह एकूण १४ लाख ५३ हजार ९५० रुपयांचा ऐवज जोरट्याने लंपास केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी दापोली पोलीसांनी संशयित म्हणून नासिर वजीर चिपळूणकर, बाकीर चिपळूणकर, वजीर चिपळूणकर, रऊफ काजी, शाहरुख चौले यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.