नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अत्यंत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहे.यानुसार कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना लसीकरणासंदर्भात नवीन सूचना केल्या आहेत.यानुसार,कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस सुमारे ४ ते ८ आठवड्यांनी द्यावा.यापूर्वी कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांच्या अंतराने दिला जात असे.आता मात्र,कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील काळ वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. NTAGI आणि कोरोना लसीकरणावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या पथकाने यावर केलेल्या अभ्यासानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात कोव्हिशिल्ड कोरोना लसीचा दुसरा डोस ४ ते ८ आठवड्यादरम्यान दिल्यास तो अधिक प्रभावी आणि लाभदायक ठरू शकतो,असा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.त्यामुळे राज्य सरकारने या निर्देशांचे पालन करावी,अशी सूचना केंद्राकडून करण्यात आली आहे.