कोल्हापूर:- कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसमध्ये थांबलेल्या रेल्वे डब्याला रविवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. रेल्वे पोलिस प्रशासन घडल्या प्रकाराची चौकशी करत आहे. कोल्हापूर मधील रेल्वे स्थानकात धुराचे लोट दिसू लागले अन् पाहता पाहता आगीच्या मोठ्या ज्वालांनी आसमंत व्यापला. काही मिनिटांतच रेल्वेचा डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. स्थानक परिसरात धूर आणि आगीच्या तांडवाने स्थानकात उपस्थित रेल्वेचे कर्मचारी आणि प्रवासी हबकून गेले. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत रेल्वे डबा जळून खाक झाला होता. रेल्वे स्थानकावर नेहमीच्या रुळाऐवजी दुसर्या स्वतंत्र रुळावर एक जादाचा डबा (एक्स्ट्रा कोच) असतो. या डब्याला आग लागली. याठिकाणी कोणीही प्रवासी किंवा कर्मचारी नव्हते.