रत्नागिरी:जिल्हा परिषद अध्यक्ष, तसेच विषय समिती सभापती पदाची निवडणूक २२ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. इच्छुकांची दिवसागणिक संख्या वाढत जात आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. पक्ष आदेशानंतर जि. प. अध्यक्ष रोहन बने, बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, शिक्षण व अर्थ सभापती सुनील मोरे, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांनी प्रशासनाकडे राजीनामे सादर केले होते. हे राजीनामे मंजूर झाल्यानंतर रिक्त जागांसाठी निवडणूक विभागाने निवडणुकीची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार २२ मार्चला ही निवडणूक होणार असून, अध्यक्ष व विषय समिती सभापती पदासाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र, दुपारी ३ ते ३.१५ नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी ३.१६ ते ३.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र मागे, दुपारी ३.३० नंतर एका जागेसाठी दोन अर्ज किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज आले आल्यास मतदान असा हा निवडणुकीचा कार्यक्रम असणार आहे.
निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या यादीत दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसत आहे. खरी चुरस आहे ती अध्यक्षपदासाठी. सध्या तरी या पदासाठी खेडचे अरूण उर्फ अण्णा कदम, चिपळूणचे बाळकृष्ण जाधव, रत्नागिरीचे उदय बने त्याचबरोबर वडिलांबरोबर सेनेत अधिकृत प्रवेश केला नसला तरी चिपळूणचे विक्रांत जाधव यांचे नाव पुढे येत आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, या बाबत उत्सुकता आहे.सभापतीपदासाठी लांज्याचे चंद्रकांत मणचेकर, पूजा नामये, खेडच्या स्वप्नाली पाटणे, दापोलीच्या रेश्मा झगडे, रत्नागिरी देवयानी झापडेकर यांची नावे चर्चेत आहेत.