रत्नागिरी दि.24: या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. चिपळूण पंचायत समिती येथे आयोजित नैसर्गिक आपत्तीच्या पाश्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, विभागीय आयुक्त श्री. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सामंत म्हणाले पुराचे पाणी ओसरले असून पाणी ओसरल्यानंतर रोगराई होऊ नये, व्यापाऱ्यांचे सर्व पंचनामे त्यांना त्रास न होता तात्काळ करावेत यासाठी महसूल यंत्रणा व विमा कंपनीच्या प्रतिनिधी निर्देश दिले आहेत. व्यापाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाने फोटोग्राफर, व्हीडीओग्राफर ची व्यवस्था केली असून ते बाजारात फोटो, व्हीडीओ शुटींग करत आहे. व्यापाऱ्यांशीही प्राथमिक चर्चा झाली असून त्यांना जे अपेक्षित आहे ते शासनाकडे मांडू. शासन या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येकाच्या मागे ठामपणे उभा आहे, असेही ते म्हणाले. अजुनही चिखल मोठया प्रमाणावर असल्याने 30 ते 35 डंपरची आवश्यक लागणार असून त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई येथील स्वच्छता करणाऱ्या एजन्सींनाही संपर्क साधण्यात येत असल्याचे ते म्हणाले. औषध फवारणीही युध्दपातळीवर सुरु करण्यात येत असून यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळया टिम तयार करण्यात आल्या आहेत. महामार्गावरुन उद्या संध्याकाळपर्यंत कमी वजनाच्या वाहने सुरु करता येऊ शकतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. चिपळूण मधील सर्व मेडीकल बंद असल्याने चिपळूण वासियांना आवश्यक औषधांसाठी शासकीय मेडीकल सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भाग स्वच्छ करणे, इंन्शुरंस कंपनी व व्यापारी यांच्यात समन्वय साधणे, पंचनामे, पाण्यासाठी जनरेटर आणणे,जेसीपी आणणे, औषध फवारणी आदि विषयांवर या आढावा बैठकीत चर्चा झाली.