जिल्ह्यातील पोसरे येथे झालेल्या दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती.यात सतरा ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पालकमंत्री अँड.अनिल परब यांच्या हस्ते आज मदत व अन्नधान्य वाटप करण्यात आले. शासन खंबीरपणे या सर्वांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री श्री.परब यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील पोसरे येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश आज पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात आज मृतांच्या वारसांना हे धनादेश देण्यात आले तसेच खेड तालुक्यातील बीरमणी येथे मृत्यू पावलेल्या दोन मृत व्यक्तींच्या वारसांना धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ॲड.परब म्हणाले, दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे, ही काळाची गरज बनली आहे. यासाठी अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादही आवश्यक आहे. दरड प्रवण क्षेत्रातील वस्त्यांची यादी तयार करावी आणि अशा नागरिकांची म्हाडाच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था होण्याबाबतची योजना तयार करण्यात येईल. पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी मी स्वीकारतो असेही त्यांनी सांगितले .