दापोली- येथील सावंत परिवाराचा प्रसिद्ध ‘शिवनेरी गणपती’ गेल्या पंचावन्न वर्षांपासून  सावंत परिवाराच्या दापोली बुरोंडी नाका येथील ‘शिवनेरी’ निवासस्थानी विराजमान होत असून दरवर्षी एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक देखाव्यासाठी हा सावंत परिवाराचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे.

दापोली तसेच बाहेरगावाहून अनेक गणेशभक्त गणेशोत्सव काळात या गणपतीचे दर्शन घेऊन येथील देखाव्याचा अनुभव घेतात.

सुमारे पंचावन्न वर्षांपुर्वी दापोली येथील मनोहर सावंत यांनी ‘शिवनेरी’ या निवासस्थानी हा सावंत परिवाराचा गणेशोत्सव सुरु केला.

त्यांच्यानंतर त्यांचे मुलगे अशोक, प्रकाश, मधुकर, अविनाश अशा चौघांनी ही गणेशोत्सवाची परंपरा पुढे सुरु ठेवली आहे.

यांपैकी आज अशोक सावंत हेदेखील हयात नसले तरी सावंत परिवाराने  वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाचे हे व्रत अव्याहतपणे सुरु ठेवले आहे.

दरवर्षी येथील गणपतीकडील एखाद्या सामाजिक, संवेदनशील, सांस्कृतिक किंवा अध्यात्मिक विषयावर आधारित जीवंत देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची रीघ लागते.

यावर्षी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील परमपूज्य स्वामी समर्थांचा देखावा  निर्माण करण्यात आला असून तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

वटवृक्षाखाली स्वामी समर्थांची प्रसन्न मुद्रेत बसलेली मूर्ती असून पुढ्यात स्वामींच्या पादुका आहेत.

या पादुकांना हाताने स्पर्श केला असता वटवृक्षाच्या बुंध्यात श्री दत्तगुरुंच्या प्रतिमेचे दर्शन घडते.

श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामींदर्शनाची अनुभूती घेण्यासाठी दापोली परिसरातील अनेक भक्तजन सावंत परिवाराच्या ‘शिवनेरी गणपती’स भेट देत आहेत.