रत्नागिरी,दि. 29 :- जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरु केली आहे, शासकीय मदतीवाचून एकही नागरिक वंचित राहणार नाही,असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथे सांगितले.
चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, शासनाकडूनही सर्वतोपरी आवश्यक ती मदत केली जाईल. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआएफ, नेव्ही, आर्मी, सामाजिक संस्था यांनी पूर परिस्थितीमध्ये रेस्क्यूचे चांगले काम केले आहे. पंचनामे पूर्ण करण्याचे काम सुरु झाले आहे. पंचनामे पूर्ण होताच ज्याप्रमाणे नुकसान झाले आहे त्याप्रमाणे सर्व बाधित नागरिकांना शासनाकडून मदत निश्चित केली जाईल.
या दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण शहरात नागरिकांशी संवाद साधला. तसेच शालेय मुलांशीही संवाद साधून त्यांची आपुलकीने विचारपूस केली. या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले, पूरपरिस्थितीमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवू नये, म्हणून आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. शहरातील चिखल, कचरा स्वच्छ करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई महानगरपालिकांकडून मशिन्स पुरविण्यात आले असून त्यांनी स्वच्छतेचे काम सुरु केले आहे. दरडग्रस्त भागात सक्शन मशिन्स पोहोचण्यासाठी काही अडथळे निर्माण होत आहेत, तरीही त्यातून मार्ग काढून नागरिकांना मदत पोहोचविली जाईल.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पूरबाधित नागरिकांना मदत देण्यात आली.