कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असतानाता आता एक चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना व्हॅक्सिन निर्माती स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोरोनाच्या नेझल अर्थात नाकातून घेतल्या जाणा-या लसीची चाचणी सुरु केली आहे. या प्रॉडक्टचं नाव BBV154 असं आहे. हे एक इंटरनेझल व्हॅक्सिन आहे. फेब्रुवारीमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (SDSCO) ने भारत बायोटेकला व्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी 10 लोकांना निवडण्यात आलं आहे.आतापर्यंत 2 लोकांना ही लस देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे. भारत बायोटेकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. महत्वाची बाब ही की, भारत बायोटेकची नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी ठरल्यास देशातील लसीकरण मोहीम अजून सोपी आणि वेगवान होईल. भारत बायोटेकने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार केला आहे. या नव्या नेझल व्हॅक्सिनचा केवळ एकच डोस घ्यावा लागणार आहे. संशोधनानुसार हा सर्वात चांगला पर्याय आहे, असं भारत बायोटेकचे डॉ. कृष्णा इल्ला यांनी त्यावेळी सांगितलं होतं.