मुंबई: राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदा परीक्षा कशापद्धतीने होणार? याबद्दल पालकांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करत दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती आज (शनिवार) पत्रकारपरिषदेत दिली. त्यानुसार इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची त्यांनी जाहीर केलं. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. याचबरोबर, लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. तसेच, प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल)परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. अशी देखील त्यांनी माहिती दिली.