चिपळूण: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक प्राथमिक शिक्षक पतपेढी शाखा चिपळूण येथे रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी राज्य कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

गोंदवले येथे आयोजित राज्याच्या भव्य महामंडळात राज्य कार्याध्यक्ष पद मिळाल्याबद्दल संतोष कदम यांचा जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा पदाधिकारी, मार्गदर्शक, तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सत्काराबद्दल धन्यवाद देण्यात आले.

बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली:

१. संचमान्यता रद्दची मागणी: राज्य शासनाच्या नव्या संचमान्यतेमुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. ही मान्यता त्वरित रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे, असे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य कार्यकारिणी मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात मंत्र्यांची भेट घेणार आहे. संचमान्यता रद्द न झाल्यास राज्य संघ तीव्र आंदोलन करणार आहे.

२. जिल्हा अधिवेशन: संघाचे दैवत संभाजीराव थोरात (तात्या) यांच्या आदेशानुसार लवकरच जिल्हा अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येईल. या अधिवेशनाला सर्व राज्य कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे. तसेच, अधिवेशनात पदांची निवड करताना संघटनेच्या ठरावाप्रमाणे ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम लागू राहणार आहे.

३. चिपळूण तालुका कार्यकारिणीची घोषणा: जिल्हाध्यक्षांनी चिपळूण तालुका कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानुसार, दिलीप बुदर (तालुका नेते), राजेश सोहनी (तालुकाध्यक्ष), सुनील चव्हाण (सचिव), अविनाश भंडारी (कार्याध्यक्ष), अजय कदम (कोषाध्यक्ष), आणि मधुरा सोहनी (महिला तालुका प्रमुख) यांची निवड झाली आहे. जिल्हा कार्यकारिणीने नूतन तालुकाध्यक्ष व तालुका सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच, प्रत्येक तालुक्यात कार्याध्यक्ष पद निर्माण करावे, असे आदेश देण्यात आले.

४. शाळेच्या वेळेबाबत चर्चा: सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा समन्वय समिती मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शनिवारची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० ते १०.३० व उन्हाळी शाळेची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० ते ११.३० ठेवावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
जिल्हा सचिव संदीप जालगावकर यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.