दापोली शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ प्रवेश कार्यक्रमात प्रतिपादन

दापोली- अगदी केंद्र संघटकापासून ते राज्याध्यक्षांपर्यंतचा थेट सुसंवाद असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव शिक्षक संघटना आहे.

अगदी तळागाळातील प्राथमिक शिक्षक या संघटनेच्या माध्यमातून त्याची कोणतीही समस्या समर्थपणे सोडवू शकतो.

महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षकांसाठी ‘वटवृक्ष’ असलेल्या संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिक्षक संघात प्रवेश केलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांचे मी मनापासून स्वागत करतो असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष संतोष कदम यांनी दापोली येथील शिक्षक संघात प्रवेश कार्यक्रमात बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर दापोली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संदीप जालगांवकर, दापोली तालुका सचिव गणेश तांबिटकर, शिक्षक नेते अविनाश मोरे, जीवन सुर्वे, नम्रता चिंचघरकर, मार्गदर्शक शांताराम शिंदे, पतपेढीचे मंडणगड तालुका संचालक मनेश शिंदे, पतपेढीचे माजी संचालक अजय गराटे, जिल्हा शिक्षक नेते महेंद्र सावंत, मंडणगड तालुक्याचे अध्यक्ष नीलेश देवकर, अशोक सुर्वे, सत्यजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दापोली येथील श्री मंगल कार्यालयात दापोली तालुका शिक्षक संघाच्या वतीने नुकतेच शिक्षक संघात प्रवेश करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठीच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गाव ते मंत्रालय अशी थेट व प्रभावी दखल यंत्रणा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत दापोली येथील मंगेश कडवईकर, नरेंद्र जाधव, रामकृष्ण लिंगायत, अशोक गवळी, किशोर पवार, स्वप्नजा शिंदे, कविता पांढरे, सत्यप्रेम घुगे, सुहास भागवत, कविता भदाणे, विद्या गुरव, विजय गुरव, आदी अनेक प्राथमिक शिक्षकांनी शिक्षक संघात जाहीर प्रवेश केला.

दापोली शिक्षक संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष संदीप जालगांवकर, सचिव गणेश तांबिटकर यांनी सर्वांचे शिक्षक संघात मनःपूर्वक स्वागत केले.

यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. शिक्षक संघातील प्रवेश कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दापोली शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.