रत्नागिरी : कोकणातील कलावंतांची खाण असलेल्या रत्नागिरीत रविवारी (२१ डिसेंबर) सावरकर नाट्यगृहात ‘नाटक तमाशाचं’ या बहारदार नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राच्या लोकधारेचे आणि लुप्त होत चाललेल्या लोककलांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या या नाटकाने गण, गवळण, पोवाडा आणि लावणीच्या ठेक्यावर नाट्यगृह दुमदुमून सोडले.
लेखक प्रदिप शिवगण यांच्या लेखणीतील आणि युवा दिग्दर्शक ऋषिराज किशोर धुंदूर यांच्या दिग्दर्शनातील या नाटकात २० ते २२ कलाकारांचा संच सहभागी झाला होता. हे नाटक केवळ मनोरंजन न करता महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा एक दस्तावेज ठरले. तमाशाची निर्मिती, त्यातील विविध प्रकार, लावणीचे प्रकार, गण, गोंधळ, भारूड, छक्कड, तुमडी आणि वीररसपूर्ण पोवाडे यांचे ताकदीने सादरीकरण झाले. विशेषतः इंट्रोडक्शन, गवळण आणि बतावणी या विनोदी प्रहसनांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर टाळ्यांच्या कडकडाटाने नाट्यगृह दणाणून गेले.
दिग्दर्शक ऋषिराज धुंदूर यांनी शाहीराची (गायकाची) भूमिका उत्तम साकारली. नृत्यदिग्दर्शन आकांक्षा साळवी यांचे, कथेतील सूत्रधार दीपक माणगांवकर आणि मुख्य सूत्रधार मिथुन पवार यांचे होते.
२०१६ मध्ये रत्नागिरीतील खातू नाट्यमंदिरात पहिला प्रयोग झालेल्या या नाटकाचा प्रवास आता सावरकर नाट्यगृहापर्यंत पोहोचला आहे. दिग्दर्शक ऋषिराज म्हणाले, “प्रेक्षागृह तुडुंब नव्हते, पण उपस्थित दर्दी रसिकांनी प्रत्येक लोककला प्रकाराला उत्स्फूर्त दाद दिली. यामुळेच आम्ही सर्वांची मने जिंकली.”
मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या या नाटकाचे प्रयोग आता कोकणापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा टीमचा मानस आहे. कार्यक्रमाची सांगता भैरवीने झाली.
अशा अस्सल मराठमोळ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संपर्क : ऋषिराज धुंदूर – ७३८७७७२४८५

