शिवसेना (युबीटी) तालुका प्रमुखांनी शिवसेना सोडली

रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वचा मंगळवारी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

बंड्या साळवी शिवसेना सोडणार अशी चर्चा अधून मधून गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु ते याला नकार देत होते. आज अचानक पणे त्यांनी जिल्हाप्रमुखांना राजीनामा देऊन रत्नागिरीमध्ये खळबळ माजवून दिली आहे. आपण आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया बंड्या साळवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राजीनाम्यानंतर लवकरच साळवी हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे.

बंड्या साळवी यांनी यापूर्वी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती आणि ते निवडून देखील आले होते. आता पुन्हा एकदा ते रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरतील का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*