दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

17 वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने अंतिम विजेतेपद पटकावले, तर 14 वर्ष वयोगटातील संघाने उपविजेतेपद मिळवले.

विजेत्या 17 वर्ष वयोगटातील संघाला आता विभागीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे 17 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित शालेय स्पर्धेत टाळसुरे विद्यालयाच्या 14 वर्ष वयोगटातील संघाने 17 सप्टेंबर रोजी अंतिम फेरीत उपविजेतेपद मिळवले.

त्याचबरोबर 18 सप्टेंबर रोजी 17 वर्ष वयोगटातील संघाने पहिल्या सामन्यात संगमेश्वर तालुका यांच्याविरुद्ध 49-41 अशा गुणांनी विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात राजापूर तालुक्याविरुद्ध 36-10 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात चिपळूणविरुद्ध 43-29 अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामन्यात खेड तालुक्याविरुद्ध 53-31 अशा दणदणीत विजयासह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

या स्पर्धेत श्रेयश लाले, वेदांत शिगवण, स्वीितेश लाले आणि प्रभात पिंपळकर यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, सदस्य अशोक जाधव, मुख्याध्यापक संदेश राऊत, मार्गदर्शक जीवन गुहागरकर, सुयोग लाले, महेश लाले, संजोग लाले, प्रथमेश लाले, दीपनंदा बोधे आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह नितीन बांद्रे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

तसेच, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.