मुंबई : राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थीना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे.
आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एक जण कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला ५ सप्टेंबरला बेड्या ठोकल्या होत्या. राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, रा. कातराबाद) असे त्याचे नाव आहे.
विशेष म्हणजे, नागरेला पोलिसांनी अटक करताच थेट मंत्रालयातून पोलिसांना फोनाफोनी सुरु झाल्याने, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे.
राजू नागरेला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे मास्टर कार्डसह दोन मोबाईल मिळाले होते. नागरे हा परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घरून आतमध्ये कॉपी पुरवत होता.
यासाठी तो या कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये देत होता. मात्र, संशय आल्याने परीक्षा केंद्राबाहेर उभा असलेल्या नागरेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. या सर्व प्रकरणात एकूण 7 आरोपी आहेत.
परीक्षा केंद्रातील कर्मचारीच सहभागी
चिकलठाणा एमआयडीसी भागात टीसीएस कंपनीमार्फत आय ऑन डिजिटल हे परीक्षा केंद्र चालवले जाते. या केंद्रात राज्य आणि केंद्राच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात.
दरम्यान याठिकाणी अनेक कर्मचारी शिफ्टनुसार काम करतात. मात्र, आता हे केंद्र कॉपीच्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी वनरक्षक भरतीत याच टीसीएस केंद्रातील कर्मचारीच बाथरूममध्ये कॉपी पुरवत असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर आता तलाठी भरतीत देखील राजू नागरेला टेलिग्रामद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर पाठवण्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहेत.