रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब करून म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर, आणि वारंवार हात धुवून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या जिविताची काळजी घ्यावी असे आवाहन केले. वाढत्या रूग्णसंख्येकडे गांभीर्याने पहा आणि काळजी घ्या, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि लसीकरण मोहीम संदर्भात आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत उपस्थित प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांना नव्याने वाढणारी रुग्णसंख्या गंभीरपणे घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात आणि लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाभरात होणारे धार्मिक उत्सव, लग्नविधी इत्यादी कार्यक्रम शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून होतील याची दक्षता घ्यावी तसेच नियमांचे उल्लंघन होताना दिसल्यास कारवाई करण्यात यावी असेही निर्देश दिले. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील मुलांच्या उपस्थिती संदर्भात स्थानिक पातळीवर कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात यावेत असेही श्री सामंत सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आरोग्य आणि बांधकाम सभापती महेश म्हाप, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग, अप्पर जिल्हाधिकारी शिंदे साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी कामलापूरकर मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक फुले, निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड, प्रांत सूर्यवंशी तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या सह संबंधित यंत्रणेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला जिल्हाधिकारी मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जाखड दूर दृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले.