टाळसुरे विद्यालयाचे श्रेयस लाले, वेदांत शिगवण यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघात निवड

दापोली : १८ वर्षाखालील मुलांच्या २०२५ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघाची घोषणा झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे येथील श्रेयस लाले आणि वेदांत शिगवण यांची जिल्हा संघात निवड झाली आहे. याशिवाय, दापोलीतील नयन ठोंबरे याचाही जिल्हा संघात समावेश झाला आहे.

संघाचे प्रशिक्षक म्हणून संतोष शिर्के आणि व्यवस्थापक म्हणून महेश शिंदे काम पाहणार आहेत. सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, टाळसुरे येथे खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. श्रेयस लाले याची महाराष्ट्र राज्य संघातही निवड झाली असून, वेदांत शिगवण याला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

अमर भारत क्रीडा मंडळ, टाळसुरे यांच्या माध्यमातून खेळाडूंना विशेष मार्गदर्शन दिले जाते. चालू वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठीही खेळाडू तयार करण्याचे प्रयत्न अमर भारत क्रीडा मंडळ आणि न्यू इंग्लिश स्कूल, टाळसुरे करत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाचे विशेष मार्गदर्शन दिले जाते.

अमर भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर लाले, सुयोग लाले आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन बांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना घडवण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जळगावकर, सदस्य अशोक जाधव, विजयकुमार खोत आणि मुख्याध्यापक संदेश राऊत यांनी खेळाडूंना अभिनंदन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*