रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयातर्फे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणा-या मिठाई विक्रेते, किराणा दुकान इत्यादी आस्थापनांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये मारुती मंदिर येथील हिरापन्ना मिठाईवाला व त्याजवळील एका हॉटेल चालकाला प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याने आस्थापना बंद करण्याचे निर्देश देऊन प्रत्येकी रु. ११,०००/- दंड आकारून तो वसूल करण्यात आला. तसेच तेथील गजानन स्वीट्स अँड कोलड्रिंक्स येथे ग्राहकाची गर्दी आढळून आल्याने दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्याचप्रमाणे एस. टी. स्टँड जवळील राधेश्याम स्वीटमार्ट, रुची स्वीटमार्ट व स्वरूप स्वीटमार्ट यांनी केलेल्या उल्लंघनामुळे दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे हनुमान स्वीटमार्ट, गोखले नाका, रत्नागिरी यांचेकडूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्याने दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन (म. रा)ही कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यापुढेहही अशाच प्रकारची कारवाई घेण्यात येणार असल्याचे सहा. आयुक्त (अन्न) यांनी सांगितले.

सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न पदार्थ पुरवठा करताना त्यांचे कर्मचाऱ्यांमार्फत होम डिलिव्हरीचा पर्याय वापरावा व होम डिलिव्हरी देणाऱ्या व अन्न पदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची RTPCR ची चाचणी किंवा लसीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे सांगून सर्व व्यवसायिकांनी वरील तरतुदीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.