दापोली – रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जाणारा आंबेत सावित्री पूल हा अखेर येत्या दहा फेब्रुवारीपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
सावित्री नदी दुर्घटनेनंतर आंबेत पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पुलाच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी सुवर्णदुर्ग शिपींग ची ‘इश्वरी’ ही फेरीबोट प्रवासी वर्गाला सेवा देणार आहे.
प्रादेशिक बंदर अधिकारी सुनिल पाटील यांच्या शुभहस्ते या फेरीबोटीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी डॉ. चंद्रकांत मोकल-चेअरमन, डॉ. योगेश मोकल-मँनेजिंग डायरेक्टर,डॉ. चेतना गोरीवले, म्हाप्रळच्या नवनिर्वीचित सरपंच संध्या धाडवे, उपसरपंच अझर मुकादम, सुलतान मुकादम, संमद मांडलेकर, हेमंत मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ व रायगड जिल्ह्यातील आंबेत हे 300 ते 400 मीटरचा प्रवास असणार आहे. दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. फेरीबोटीतून प्रवाशांना अवजड आणि छोटी वाहनं नेता येणार आहेत. दिवसातून फेरीबोटीच्या 23 फेऱ्या असणार आहेत.