‘सोने-चांदी पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एकाचा मृत्यू !

खेड : सोने-चांदी पॉलिश करून फसवणूक प्रकरणी येथील पोलिसांनी मनमाड नाशिक येथून दिनांक २१ जानेवारी रोजी एका टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टोळीतील एकाचा बुधवार दि. २४ जानेवारी रोजी तालुक्यातील कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाला आहे.

या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

खेड शहराजवळील भरणे येथे दि. ८ जानेवारी रोजी दुपारी १२ : १५ वाजण्याच्या सुमारास एका ज्येष्ठ महिलेला तिच्या घरातील अंगणात उभ्या असताना एका अनोळखी इसमाने “तुम्हाला सोने-चांदी पॉलिश कारायची आहे का?

मी तुम्हाला ते करून देतो, माझ्याकडे एक पावडर आहे.” असे सांगून तिला बेशुद्ध करून हात चलाखी करून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले होते.

या घटनेत ४ लाख ८० हजार इतक्या किमतीच्या ४ सोन्याच्या बांगडया व २ सोन्याच्या पाटल्या घेऊन संशयिताने पोबारा केला होता.

फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला.

खेड पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे आपल्या पथकासह या गुन्ह्याचा तपास करत होते.

त्यांच्या पथका मार्फत या गुन्ह्यामध्ये जुन्या प्राप्त माहितीच्या व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून नाशिक मधील मनमाड येथून दि.२१ रोजी सोने पॉलिश टोळी ताब्यात घेतली.

या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अश्या प्रकारे सोने चांदी पॉलिश करून देतो सांगून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जालना व संभाजी नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये महंमद सुबेर इम्रान शेख (वय २८), साजिद लाडू साह(वय २४), महंमद आबिद इल्यास शेख (वय २९), महंमद जुबेर फती आलम शेख (वय ३२, सर्व राहणार तुळसिपुर, जमुनिया, जिल्हा भागलपुर, राज्य बिहार) तसेच नंदकुमार श्रीरंग माने (वय ५० रा. मनमाड ,शिवाजी चौक, तालुका नांदगाव , जिल्हा नाशिक) यांचा समावेश आहे.

या संशयित आरोपींपैकी महंमद सुबेर इम्रान शेख (२८, तुळसिपुर, जमुनिया, जिल्हा भागलपुर, बिहार) याला पोलीस कोठडीत अस्वस्थ वाटू लागल्याने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्याला उलट्या होत असल्याने कर्तव्यावर असलेले डॉक्टर एस. के. बळवंत यांनी प्राथमिक उपचार सुरू केले. परंतु त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मोहंमद शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे नेण्यात येणार असल्याचं डॉ. बळवंत यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*