खा. सुनील तटकरे यांची जिल्हा बँकेला सदिच्छा भेट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस खासदार सुनिल तटकरे, अध्यक्ष पेट्रोलियम व नैसर्गिक वायु समिती, तसेच आमदार शेखर निकम, आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी भेट दिली.

या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुनिल तटकरे, शेखर निकम व किरण उर्फ भैया सामंत यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करणेत आला होता.

या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे संचालक रामभाऊ गराटे, महेश खामकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण व बँकेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा बँकेने केलेल्या सत्कारप्रसंगी बोलताना, खासदार सुनिल तटकरे यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद असून, त्याचे सर्व श्रेय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची शिस्त व त्यास बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी दिलेली साथ यांचे असल्याचे गौरवोद्‌गार काढले.

रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात एक नावाजलेली जिल्हा बँक म्हणून नाव कमावले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, देशात सहकाराची पडझड होत असताना बँकेचा व्यवसाय टिकवून ठेवणे, ग्राहक टिकवून ठेवणे हे जोखमीचे असताना देखील या परिस्थितीवर मात करुन रत्नागिरी जिल्हा बँकेने आपल्या ग्राहकांकरीता आधुनिक बँकींग सेवा सुविधा उपलब्ध करुन देऊन बँकेची प्रगती साधण्यावर लक्ष केंद्रीत केले.

यात जिल्हा बँक पूर्णपणे यशस्वी झाली आहे. म्हणूनच आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये घेतले जाते.

सुनिल तटकरे यांनी आपले मनोगतामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना जास्तीत जास्त व चांगल्या प्रकारे कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*