वरवडे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी.ओ.), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन, रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल, नंदादीप आय हॉस्पिटल, रामनाथ हॉस्पिटल, रत्नागिरी तसेच जल जीविका, पुणे यांच्या सहकार्याने वरवडे येथे मोफत आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात सर्वाइकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, रक्त तपासणी आणि ईसीजी चेकअप यासारख्या मल्टी डायग्नोस्टिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे ७० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला, अशी माहिती आयोजकांनी दिली.

रामनाथ हॉस्पिटलतर्फे ईसीजी तपासणी, ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हील हॉस्पिटलतर्फे मधुमेह, सर्वाइकल आणि ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, तर नंदादीप हॉस्पिटलतर्फे नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय, सिव्हील हॉस्पिटलच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गांधी डिस्ट्रिब्युटरतर्फे शिबिरासाठी मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन वरवडे गावचे उपसरपंच श्री. गजानन हेदवकर यांच्या शुभहस्ते आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी तसेच प्रमुख अन्वेषक डॉ. सुहास वासावे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा ऋचा गांधी, सेक्रेटरी सुवर्णा चौधरी, ट्रेझरर श्रद्धा सावंत, रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे, बिपिनचंद्र गांधी, रोटे. डॉ. संदीप करे, सेक्रेटरी राजेंद्र (दादा) कदम, मत्स्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुहास वासावे, डॉ. संदेश पाटील, भालचंद्र नाईक, जल जीविका रत्नागिरीचे चिन्मय दामले, रामनाथ हॉस्पिटल आणि सिव्हील हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराचे यशस्वी व्यवस्थापन चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा रीना सुर्वे, उपाध्यक्षा कांचन लाकडे, माजी अध्यक्षा अस्विता पटेकर, प्रज्योती पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय पटेकर आणि विलास पटेकर यांनी केले.