हजारो विद्यार्थ्यांसाठी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने नऊ गावे – नेवरे, धामनसे, बसणी, कोतवडे, राजापुर कुंभवडे, नाणार नाणर, फणसोप आणि खेडशी येथील १२ शाळांमधील २३३७ विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराची सुरुवात सोमवारी झाली असून, त्यात विद्यार्थ्यांची नेत्र, दंत, कान, नाक, घसा तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली जात आहे.

तपासणीसाठी पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल, एच व्ही देसाई आय हॉस्पिटल, सिंघगड डेंटल कॉलेज आणि श्री डेंटल क्लिनिक रत्नागिरी येथील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.

मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका रितू छाब्रिया यांनी सांगितले, “आपल्याकडे अनेक रुग्णालये असली तरी तांत्रिकदृष्ट्या प्रगत पायाभूत सुविधा आणि सेवांचा अभाव आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर आमचे लक्ष आहे.

याचाच एक भाग म्हणून २०१० साली श्री लक्ष्मीकेशव स्कूलमध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली. दरवर्षी दोन वेळा शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते.”

या शिबिरात रत्नागिरी आणि पुण्याच्या नामांकित रुग्णालयांमधील तज्ञ डॉक्टर्सनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. ज्यांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे, त्यांना पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये मोफत आणि अल्प दरात उपचार केले जात आहेत.

उपचारांच्या योग्य पाठपुराव्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन सदैव तत्पर असतात.

या उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा मिळविण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*