दापोली- चंद्रनगर येथील कला क्रीडा शिक्षण संस्थेच्या वतीने चंद्रनगर शाळेत नुकतेच शिक्षक-बालक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एका दिमाखात समारंभात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतर्गत आकर्षक व शालोपयोगी बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
या समारंभासाठीच्या व्यासपीठावर कला क्रीडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद मुलूख, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, सल्लागार विजय मुलूख, प्रविण मुलूख, सचिव स्वरुप मुलूख, मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मिसाळ, पोलीस पाटील गौरी पागडे, ग्रामसेवक संदीप सकपाळ, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रनगर येथील कला क्रीडा शिक्षण संस्था दरवर्षी चंद्रनगर गावातील मुलांसाठी शिक्षक-बालक-पालक मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करते. चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करते.
या विशेष कार्यक्रमात चंद्रनगर शाळेतील विद्यार्थी प्रसाद शिगवण याला यावर्षीचा आदर्श विद्यार्थी, विराज मुलूख याला गुणवंत विद्यार्थी तर मंजिरी पवार व श्रावणी कोळंबे यांना होतकरू विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले.
याशिवाय वक्तृत्व, निबंधलेखन, चित्रकला, पाठांतर, स्मरणशक्ती, संगीत खुर्ची, बादलीत नाणे टाकणे, स्टंटवर बाॅल मारणे, सुईत दोरा ओवणे यांसारख्या स्पर्धांमधील विजेत्यांनाही या समारंभात गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मोहन मुळे यांच्या प्रयत्नांतून दिल्ली येथील गुंज या संस्थेकडून प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्याचे चंद्रनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यानिमित्ताने सर्व शिक्षक-बालक-पालक व ग्रामस्थांना भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्याचे सूत्रसंचालन स्वरुप मुलूख यांनी केले व शैलेश मुलूख यांनी सर्वांचे आभार मानले.