रत्नागिरी: थिबा कालीन बुद्ध विहार परिसरात कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली बुद्ध विहार उभारले जात असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे, असा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. शासकीय कागदपत्रांवर कम्युनिटी सेंटर अशीच नोंद असून, याच नावाने बुद्ध विहार उभारण्याच्या प्रयत्नाला बौद्ध समाजाचा तीव्र विरोध आहे. उच्च न्यायालयाचा दाखला देऊन समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याचा दावाही समाजाने केला आहे. थिबा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीने ही जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून तिथे केवळ बुद्ध विहारच उभारले जावे.

शासकीय विश्रामगृह माळनाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी ही मागणी मांडली. ते म्हणाले, “उच्च न्यायालयाने कम्युनिटी सेंटरविरोधातील याचिका फेटाळल्याचा दावा केला जात आहे. तसेच, बांधकामावरील स्थगिती उठवल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात, जिल्हा न्यायालयाने अद्याप स्थगिती उठवलेली नाही. त्यामुळे काही जण खोटा प्रचार करून समाजात संभ्रम निर्माण करत आहेत.”

सावंत पुढे म्हणाले, “थिबा कालीन बुद्ध विहाराची जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. शासनाने ही जागा समाजाला दिल्यास याठिकाणी बुद्ध विहार उभारले जाऊ शकते. मात्र, कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली बांधकाम केले जात आहे, ज्याला समाजाचा तीव्र विरोध आहे.”

यावेळी समितीचे सल्लागार दिवेन कांबळे यांनी सांगितले, “कम्युनिटी सेंटरमध्ये सभागृह, वाचनालय आणि संग्रहालय असे स्वरूप आहे. बुद्ध विहार हे धार्मिक स्थळ आहे आणि त्याची पवित्रता आहे. त्यामुळे कम्युनिटी सेंटरला बुद्ध विहार म्हणणे अशक्य आहे. आम्हाला केवळ बुद्ध विहारच हवे आहे आणि यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली बुद्ध विहार उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा बौद्ध समाजाला मान्य नसून, त्यांनी केवळ बुद्ध विहारासाठीच आग्रह धरला आहे. पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार, शिवराम कदम, बी. के. कांबळे, चंद्रकांत जाधव, अजित जाधव, प्रदीप पवार, रुपेश कांबळे, दीपक जाधव, धीरज पवार, रत्नदीप कांबळे, केतन पवार, राजन जाधव, संजय आयरे, दीपक पवार आदी उपस्थित होते.