करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सभा, समारंभांवर बंदी, ५० टक्के च कार्यालयीन उपस्थिती, विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. रेल्वेप्रवासावर मात्र अद्याप तरी निर्बंध लागू करण्यात आलेले नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने स्वयंशिस्त पाळा, अन्यथा टाळेबंदी लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्याच महिन्यात दिला होता. मात्र, राज्य सरकारने सरसकट टाळेबंदी करण्याऐवजी कठोर निर्बंध लागू केले आहेत. ३१ मार्चपर्यंत हे सारे निर्बंध लागू राहतील, असा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला. कोरोना रुग्ण वाढल्यास टाळेबंदी अथवा कठोर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने यापूर्वीच स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. गर्दी कमी करण्यावर सरकारने भर दिला आहे.
सर्व कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. शक्यतो घरून काम करण्यावरच भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणारी कार्यालये कोरोना महासाथ आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येतील, असे कठोर पाऊल सरकारने उचलले आहे. सध्या खासगी तसेच सरकारी कार्यालयांमध्ये १०० टक्के उपस्थिती असल्याने गर्दी वाढली आहे.
सर्व प्रकारची सिनेमागृहे, हॉटेल हे ५० टक्के प्रवेश क्षमतेवरच सुरू राहतील. मॉल्सचालकांनाही लोकांना प्रवेश देताना सिनेमागृह, हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-धार्मिक कार्यक्रम-सभांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही सभागृहाने-आस्थापनेने अशा कार्यक्रमांसाठी परवानगी दिल्यास कोरोना आपत्ती संपेपर्यंत ती आस्थापना बंद ठेवली जाईल.
लग्नासाठी जागा देता येईल. पण विवाह समारंभाला केवळ ५० जणच उपस्थित राहू शकतील. अंत्यसंस्कारालाही केवळ २० जणांनाच परवानगी देण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थेने याची अंमलबजावणी होईल याची खबरदारी घ्यायची आहे.
सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्यांनी एका दिवसात आणि एका तासात किती भाविकांना प्रवेश दिला जाईल हे जाहीर करावे. शक्यतो ऑनलाइन नोंदणी करूनच दर्शनासाठी प्रवेश द्यावा. गृहविलगीकरणात असलेल्यांच्या घरावर त्याबाबतची माहिती १४ दिवसांसाठी द्यावी, स्थानिक स्वराज्य संस्था व डॉक्टरांच्या देखरेखीखालीच गृहविलगीकरण करता येईल. तसेच संबंधितांच्या हातावर त्याबाबतचा शिक्का मारला जाईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीला थेट करोना केंद्रात दाखल के ले जाईल.
प्रवेशाचे नियम
धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, हॉटेल, सिनेमागृह, मॉल्स, कार्यालये अशा सर्व आस्थापनांनी मुखपट्टी वापरलेल्यांनाच प्रवेश द्यावा.
सॅनिटायझरची व्यवस्था जागोजागी करावी.
नियमभंग केल्यास करोना आपत्ती संपेपर्यंत बंदी
सभा-समारंभांची कार्यालये, हॉटेल व चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, खासगी व्यावसायिक कार्यालयांनी निर्बंधांचे पालन न केल्यास, कोरोनाविषयक शिस्त न पाळल्यास थेट कोरोना आपत्ती संपेपर्यंत ही आस्थापने बंद करण्यात येतील, असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने कोरोना ही आपत्ती म्हणून जाहीर केली असून केंद्र सरकार जोपर्यंत ती अधिसूचना उठवत नाही तोपर्यंत निर्बंधांचे उल्लंघन करणारी आस्थापने बंद करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वे वापरास मुभा
राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले असले तरी मुंबई व ठाणेकरांच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे प्रवासावर कोणतेही निर्बंध लागू केलेले नाहीत. यापूर्वी लागू केलेल्या नियमानुसारच रेल्वेचा वापर करता येईल. कार्यालयीन उपस्थितीवर निर्बंध आणल्याने रेल्वे गाड्यांमधील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. तीन-चार दिवसांत त्याचा आढावा घेऊनच मग पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच वाहनांतून प्रवास करण्यावर अद्याप तरी कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.
नवे नियम काय?
सभा, समारंभांवर बंदी. विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी. सर्व कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीस परवानगी. शक्यतो घरून काम करण्यावरच भर देण्याची सूचना. सर्व प्रकारची सिनेमागृहे, हॉटेलांना ५० टक्के प्रवेश क्षमतेची मर्यादा. नियमभंग केल्यास आस्थापनांवर करोना आपत्ती संपेपर्यंत बंदी. सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्यांनी एका दिवसात किती भाविकांना प्रवेश दिला जाईल हे जाहीर करावे.