दापोली : गेले अनेक दिवस दापोलीकर आणि शिवप्रेमी ज्याची वाट पाहत होते, तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आज दापोली मध्ये दाखल झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये नियोजित जागेवर त्याची स्थापना करण्यात येणार आहे. या पुतळ्याचे बाजूने सुशोभिकरणासहीत मावळे देखील या पुतळ्याची शान वाढविणार आहेत.
या सर्व कामाला किमान दिड ते दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्या नंतरच त्याचे यथोचित उद्घाटन होणार असल्याची माहिती बांधकाम सभापती केदार परांजपे यांनी दिली.
हा छत्रपती शिवरायांचा पुतळा धातूचा असून तीन टन वजनाचा आहे. दहिसर येथील उत्तम पाचरणे यांच्या सुरुची आर्टमध्ये सुमारे तीन ते चार महिन्याच्या मेहनती नंतर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा तयार झाला आहे.
या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या सर्व कामांवर नगराध्यक्षा परवीन शेख, उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर, सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे मुख्याधिकारी महादेव रोडगे आणि आमदार योगेश कदम जातीनं लक्ष ठेवून आहेत.
त्यामुळे दापोलीकर आणि शिवप्रेमींचे छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे गेले अनेक दिवसाचे स्वप्न आता पूर्णत्वास जाण्याच्या अंतिम टप्प्यात आले आहे.