जालगांव वार्ताहर:- सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दिनांक 14 डिसेंबर पासून विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन चालू केले आहे.

हिवताप विभागासाठी असलेले जुने सेवाप्रवेश नियम 29 सप्टेंबर 2021 रोजी नवीन अधिसूचना काढून रद्द केले आहेत. आरोग्य सेवक या पदासाठी पूर्वी दहावी शैक्षणिक पात्रता नसताना ती आता बारावी विज्ञान करण्यात आली आहे, आरोग्य सहाय्यक या पदासाठी आरोग्य सेवक या संवर्गातून पदोन्नतीने देण्याचे पद असूनही सहाय्यक पदाची शैक्षणिक पात्रता विज्ञान पदवीधर करण्यात आली आहे. आरोग्य पर्यवेक्षक हे पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य सहाय्यक या कोट्यातून भरावयाचे पडत असूनही त्यासाठीही शैक्षणिक पात्रता विज्ञान पदवीधर व आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम अशी करण्यात आली आहे.
जुन्या सेवाप्रवेश नियम द्वारे राज्यात कार्यरत असलेले क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय अधिकारी या पदांना पदोन्नतीसाठी अशा जाचक नियमांमुळे अडचण तयार झाली आहे. तसेच आश्वासित प्रगती योजना मिळण्याचा मार्ग संपला आहे. कोरोना काळापासून हिवताप विभागाचे कर्मचारी इतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बरोबर काम करीत असून शासनाने त्यांच्यावर अन्याय केला आहे.

जुने सेवा प्रवेश नियम रद्द झाल्यानंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य पातळीपर्यंत निवेदने देण्यात आली असून त्याची दखल अजूनही शासनाने घेतलेली नाही त्यानंतर अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन, आक्रोश आंदोलने करण्यात आली असून आपले दुरावून घेतलेले अधिकार सर्वस्वी परत मिळविण्याचा निश्चय कर्मचाऱ्यांनी केला असून दिनांक 14 डिसेंबर पासून हिवताप विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन सुरु केले असल्याची माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस डी. एस. पवार, रत्नागिरी जिल्हा हिवताप कर्मचारी निर्मूलन संघटना अध्यक्ष डी. डी. कदम, उपाध्यक्ष स्वप्निल जोशी, सरचिटणीस एस. एस. कांबळे, कोषाध्यक्ष एस. बी. कुवळेकर संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी दिली आहे.